आयुष्मान भारत अभियानामुळे सामान्य माणूस आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही-पंतप्रधान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकोट इथल्या एम्सचा पायाभरणी समारंभ ही गुजरात राज्यातल्या आरोग्य सेवेच्या इतिहासात एक नवी पहाट होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला.आयुष्मान भारत अभियानामुळे सामान्य माणूसही आता आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

या योजनेमुळे गरिबांचे सुमारे ३० हजार कोटी रुपये वाचले आहेत, असे त्यांनी सांगितले.देशात १० एम्स बांधण्याचं नियोजन होते,त्यापैकी काही एम्स सुरू झाली आहेत.या शिवाय २० अति विशेषोपचार रुग्णालयंही बांधली जात आहेत,अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली.

या एम्स साठी २०१ एकर जमीन देण्यात आली आहे.१ हजार १९५ कोटी रुपयांचे हे केंद्र २०२२ मध्ये कार्यान्वित होईल.याअंतर्गत साडे सातशे खाटांचे अत्याधुनिक रुग्णालयही बांधले जाणार आहे.हे देशातले सर्वात मोठे रुग्णालय असेल,असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितले.

दरवर्षी १२५ विद्यार्थी इथे वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतील.या कार्यक्रमात मोदी यांनी कोविड १९ सद्यस्थितीचाही आढावा घेतला.देशातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून लसीकरणाचा कार्यक्रमही लवकरच सुरू होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.