कोरोनामुळे मुंबईतले समुद्र किनारे आणि नदी किनाऱ्यांवर छठ पुजेला मनाई


 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छठ पुजेच्या सणासाठी बृहन्मुबई महानगरपालिकेनं नियमावली जारी केली आहे. यानुसार मुंबईतले समुद्र किनारे आणि नदी किनाऱ्यांवर छठ पुजेला पालिकेनं मनाई केली आहे.

छठपुजेनिमीत्त होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे कोरोनाप्रतिबंधासाठी आवश्यक परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या निमयासह इतर नियम पाळणं कठीण होईल, त्यामुळे हा निर्णय घेतल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मात्र संबंधित अधिकारी कृत्रिम पाणवठ्याच्या ठिकाणी नागरिकांना मर्यादित संख्येनं हा सण साजरा करायची परवानी देतील असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी स्पष्ट केलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कृत्रिम पाणवठ्यांच्या ठिकाणी, पीपीई किट आणि चाचणी संचांच्या उपलब्धतेसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पथकं  तैनात केलेली असतील असंही ककाणी यांनी सांगितलं.

छठपुजेच्या विधींनुसार येत्या २० नोव्हेंबरला सुर्यास्ताच्या वेळी आणि २१ नोव्हेंबरला सुर्योदयाच्या वेळी धार्मिक विधी होतील. यावेळी कुठेही गर्दी होणार नाही याची पोलीसांनी सुनिश्चिती करावी असे निर्देशही पालिकेनं दिले आहेत.