डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (ओटास्किम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकीची निर्मिती व्हावी : प्रमोद क्षिरसागर


निगडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (सेक्टर नंबर 22, ओटास्किम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी, या मागणीचे पत्र पोलिस आयुक्त मा. कृष्ण प्रकाश यांना "लढा यूथ मूव्हमेंट" व समस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतमधील नागरिकांच्यावतीने देण्यात आले.


डॉ.. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (ओटास्कीम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी यासाठी वेळोवेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पोलिस आयुक्त याच्याशी पत्र व्यवहार केला आहे. परंतु, सदर बाबींचे गांभीर्य पोलिस प्रशासन व महानगरपालिका यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर नंबर 22 हा भाग अतिशय दाट लोकवस्ती असलेला व संवेदनशील असा आहे. निगडी पोलिस ठाणे सदर भागापासून दूरच्या अंतरावर आहे. त्यामुळे या भागात काही अनुचित प्रकार घडला, तर घटनास्थळी पोहोचण्यासाठी पोलिसांना विलंब होतो. त्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. कायद्याचा व पोलिसांचा धाक गुन्हेगारी प्रवृत्तीला राहिलेला दिसत नाही.


त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व परिसरात शांतता कायम ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी "लढा यूथ मूव्हमेंट" अध्यक्षचे प्रमोद क्षिरसागर यांनी केली आहे.


सदरच्या निवेदनावर अमित गोरे, भैय्यासाहेब ठोकळ, राष्ट्रतेज सवई, बुद्धभूषण अहिरे, सिद्धार्थ मोरे, समाधान कांबळे, संदीप माने, आप्पा कांबळे, राकेश माने, गौतम कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.