पुलवामा हल्ल्याचं राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे उघड पंतप्रधानांची विरोधकांवर कडाडून टीका


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी पुलवामा हल्ल्याचं राजकारण केलं, पण त्यांना या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्याचं दुःख झालं नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते आज  बोलत होते.


आज या अधिकाऱ्यांचे संचालन पाहताना माझ्या डोळ्यासमोर पुलवामा हल्ल्याचे चित्र उभे राहिले. आपल्या वीर सुपुत्रांच्या मृत्यूने शोकाकुल झालेला देश हा हल्ला कधीच विसरणार नाही. काही लोक या दुःखात सहभागी नव्हते. ते यातून आपला स्वार्थ साधण्यात मग्न होते. आता शेजारी राष्ट्राच्या संसदेत सत्य उघड झालं आहे. त्यामुळं देशातील विरोधी पक्षांचे खरे चेहरे पुढे आले आहेत, असं मोदी यांनी नमूद केलं.


दहशतवादाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन मोदी यांनी केलं.  दिला पाहिजे. जगात शांतता समृद्धी कायम राहण्यासाठी सर्वाची एकजूट महत्त्वाची आहे, असंही ते म्हणाले. भारतानं दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात आतापर्यंत हजारो प्राणांची आहुती दिली आहे.


देशातील शांतता, समृद्धी कायम राखण्यासाठी देशातील जनतेनं एकत्र यावं आणि एक भारत- श्रेष्ठ भारताचे उद्दिष्ट साध्य करावं, असं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं. सरकार शेतकरी, मजूर, गरीब यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संरक्षण क्षेत्रात ही देश स्वयंपूर्ण होत आहे.


आज देशात हजारो किलोमीटरचे रस्ते, पूल, बोगदे बांधण्यात येत आहेत.  कोरोनाच्या संकटाशी सगळ्या देशाने एकत्रितपणे लढा दिला असून, कोरोना योद्ध्यांचे विशेष कौतुक आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.