प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्याचं दादाजी भुसे यांचं आश्वासन


मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांमधे झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पिक नुकसानीचे आठवड्याभरात पंचनामे करावेत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. भुसे यांनी आज औरंगाबादमधे कन्नड तालुक्यातल्या नागद इथं भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पिक नुकसानीसंदर्भात आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

पंचनाम्याचे अहवाल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून, त्यानंतर मदतीसंदर्भातला निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. हे अहवाल केंद्र सरकारलाही सादर करू, तसंच नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याबद्दल विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपन्यांकडून पिकविमा काढला आहे, त्या कंपन्यांना सूचना दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल असं आश्वासनही त्यांनी दिलं.