महापरिनिर्वाण दिन : अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

 


मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. अनुयायांनी शिस्तबद्ध दर्शन घेऊन शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव श्री. डिंगळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, नागसेन कांबळे, चैत्यभूमी नियोजन समितीचे महासचिव रमेश जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांकरिता उपलब्ध केल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची तसेच बिस्किटांची सोय, आरोग्य सुविधा, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आच्छादन आणि कार्पेट टाकण्याची सूचना त्यांनी केली. फिरती स्वच्छतागृहे, थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटची व्यवस्था आदींचाही आढावा घेत उपयुक्त सूचना केल्या. शिवाजी पार्क येथे अनुयायांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ५० हजार चौ. फूट जागेत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत. येथे आलेल्या अनुयायांची श्री. केसरकर यांनी भेट घेऊन व्यवस्थेबाबत त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात उर्वरित काम पूर्ण होईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चैत्यभूमी परिसरात सहा पोलीस उपायुक्तांसह सुमारे १५०० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. अनुयायांच्या सोयीसाठी विविध संस्थांचे स्वयंसेवक देखील मदत करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत तात्पुरती निवारा व्यवस्था, टेहळणी मनोरा व नियंत्रण कक्ष, भोजन मंडप, माहिती कक्ष, आरोग्य सेवा, बांबूचे संरक्षक कठडे, क्लोज सर्किट टिव्हीद्वारे चैत्यभूमी येथील थेट प्रक्षेपण, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक व्यवस्था, फिरती शौचालये, स्नानगृहे, कचरापेट्यांची व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व बिस्कीटची व्यवस्था, रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व आसन व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.