केंद्र सरकारने बेरोजगारीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी : कौस्तुभ नवले

 

पिंपरी : मागील सात वर्षांपासून देशात वाढलेल्या बेरोजगारीची खरी आकडेवारी नागरिकांसमोर आली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने उद्योग, श्रम आणि मनुष्यबळ मंत्रालयाच्या फसव्या आकडेवारीवर अवलंबून न राहता "बेरोजगारीची सत्य परिस्थिती देणारी श्वेतपत्रिका" प्रसिद्ध करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी केली.

शनिवारी (दि.१७) चिंचवड गावातील चापेकर चौक येथे पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करीत केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, प्रदेश सरचिटणीस अनिकेत अरकडे, एनएसयूआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, शहर सरचटणीस सौरभ शिंदे, अपूर्वा इंगोले, गौरव चौधरी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, जय ठोंबरे, अजित पवार आदींनी केंद्र सरकारचा निषेध करणारे फलक हातात घेऊन घोषणा देत आंदोलन केले.

यावेळी कौस्तुभ नवले म्हणाले की, दरवर्षी दोन कोटी नवीन रोजगार उपलब्ध करू अशा भूलथापा देऊन सात वर्षांपूर्वी केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. मागील सात वर्षात रोजगार निर्माण होण्याऐवजी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि ऐनवेळी लादलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कोट्यावधी तरुणांच्या सुरू असणाऱ्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोटाबंदी आणि जीएसटी ची झळ अजूनही मध्यम लघु उद्योजकांपासून मोठ्या उद्योगांना बसत आहे. मध्यम, लघु उद्योजक, शेतीपूरक व्यवसायाला कर्जातून बाहेर येण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्पोरेट कंपन्यांना कर्जमाफी देत आहेत. केंद्र सरकारने सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्याचा नवीन उद्योग सुरू केला आहे. यामुळे नवीन रोजगार निर्मिती होणार नाही तर उलट असणारे रोजगार संपुष्टात येऊन मोठ्या भांडवलदारांचे भले होत आहे. अशा सरकारचा पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे.

यावेळी चंद्रशेखर जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या दबावामुळेच महाराष्ट्रात तळेगाव येथे येणारा वेदांता फॉक्सकॉनचा लाखो रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये तीव्र असंतोष आहे. यामुळे पुढील काळात महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे.

Popular posts
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व पसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्व
Image
एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती सुनील तटकरे
Image
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू
Image
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image