राष्ट्रीय लोक अदालतीचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन

 

पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या लोक अदालतीमध्ये न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी. फौजदारी, मोटार अपघात नूकसान भरपाई, कलम १३८ निगोशिएबल इंन्स्टुमेंट्स अॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे, तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे. बीएसएनएल. आयडिया, व्होडाफोन, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ आदींकडे बाकी असलेली देयके इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात येणार आहेत.

या लोक अदालतमध्ये ठेवण्यात येणाऱ्या प्रकरणातील पक्षकारांना नोटीसा पाठविण्यात येत असून आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेऊन तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा असलेल्या पक्षकारांनी आपापल्या न्यायालयात तसा विनंती अर्ज करावा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेली तालुका विधी सेवा समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा. अधिकाधिक पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल दीपक कश्यप यांनी केले आहे.