राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. तर आठ  जनावरं मृत्युमुखी पडली. जालना जिल्ह्यातल्या काही भागात काल झालेल्या  वादळी पावसात वीज कोसळण्याच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. मंठा तालुक्यातल्या माळकिनी आणि पेवा इथं अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर भोकरदन तालुक्यातल्या कोदा इथं अंगणात वाळत असलेले कपडे काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला, तर मृत महिलेचा मुलगा आणि सून गंभीर भाजले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी वीज पडून तीन जनावरं दगावल्याची घटना घडली आहे..गोरेगाव इथल्या  तपोवन इथं  वीज पडून एक गाय दगावल्याची घटना घडली. वसमत तालुक्यातल्या कुरुंदा इथंही  वीज पडून गाय दगावली.तर दिग्रस वाणी इथं  वीज पडून एक  म्हैस दगावली आहे. नांदेड शहरात काल रात्री १० वाजल्यापासून मध्ये रात्री दोन वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातही काल रात्री अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पाऊस झाला. जिल्ह्यातील कंधार, लोहा, कापसी, कलंबर, माळाकोळी, देगलूर, मूखेड, हिमायतनगर, किनवट, मुदखेड, माहूर, अर्धापूर आणि नांदेड इथं पावसानं हजेरी लावली. हिमायतनगर इथं ३० वर्षे वयाचा शेतकरी सुरेश परमेश्वर टोमके हा शेतातून घराकडे जात असतांना जवळ असलेल्या वृक्षावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. तर हिमायतनगरमध्ये एक जनावर दगावले आहे. लोहा तालुक्यात माळेगाव यात्रा आणि डोंगरगाव इथं दोन वेगवेगळ्या घटनेत वीज पडल्यामुळे एकुण ६ जनावर दगावली आहेत. वादळी पावसानं शनिवारी पुन्हा जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात केळीला फटका बसला आहे. जून महिन्यात तीनदा झालेल्या वादळानं केळी बागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान  झालं आहे.