पीएमकेअर्स योजनेतंर्गत प्रमाणपत्र आणि सहाय्य हस्तांतरित

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या मुलांनी कोरोनामधे त्यांचे पालक गमावले आहेत अशा मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य मिळेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या मुलांसोबत प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मुलांसाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेतील मुलांना प्रधानमंत्र्यांनी आज साहाय्य हस्तांतरित केलं. ज्या मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत, त्यांचा भार कमी करण्यासाठी पीएम केअर्स माध्यमातून मुलांसाठीची ही योजना उपयुक्त ठरेल, असं ते म्हणाले.

१८ ते २३ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी एक ठराविक विद्यावेतन निश्चित करण्यात आलं असून, जेव्हा ते २३ वर्षाचे होतील, तेव्हा त्यांना १० लाख रुपये दिले जातील. ज्या मुलांना व्यावसायिक किंवा उच्च शिक्षणासाठी कर्जाची गरज असेल त्यांना पीएम केअर्समुळे मदत होईल, असं ते म्हणाले. सरकार मुलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी चार हजार रुपये प्रतिमहिना पीएम केअर्सद्वारे पुरवत आहे. देशातल्या नागरिकांनी केलेल्या योगदानामुळे पीएम केअर्स हा उपक्रम शक्य होऊ शकला, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. या योगदानामुळे सरकारला आरोग्य सुविधा, वाढवता आल्या असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूरहुन उपस्थित होते. या योजनेमुळे मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता येईल, असं गडकरी यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या कार्यक्रमाला दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबईहुन केंद्रीय मंत्री पियूष गोयल, रत्नागिरीवरून रावसाहेब दानवे, रायगडहून कपिल पाटील, चंद्रपूरमधून डॉ भागवत कराड आणि नाशिक इथून श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते. याच कार्यक्रमात शाळेत जाण्याऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरीत करण्यात आली, तसंच प्रधानमंत्री मदत निधीचं पासबुक आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड देखील मुलांना वितरित करण्यात आलं. राज्यात सुमारे दोनशेहून अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन मधून चंद्रपूर जिल्ह्यातल्या ११ अनाथ मुलांना योजनेचा लाभ हस्तांतरित करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय वित्तराज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. सरकार कायम या मुलांसोबत असल्याची ग्वाही कराड यांनी यावेळी दिली. रायगड जिल्ह्यातील २६ अनाथ बालकांना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण करण्यात आलं. सरकारसोबत रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कंपन्या, राजकीय पक्षांचे नेते आणि इतरांनी देखील या कार्यात योगदान देऊन कोविडमुळे  अनाथ झालेल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन कपिल पाटील यांनी यावेळी केलं.

रत्नागिरीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते कोरोनाने पालक गमावलेल्या ९ लाभार्थी मुलांना किटचे वाटप करण्यात आले. जालना जिल्ह्यात ११ बालकांना पीएम केअर योजने अंतर्गत जमा झालेली रक्कम, त्याबाबतचे पासबुक,आरोग्य कार्ड, प्रधानमंत्र्यांचे पत्र आणि योजनेची माहितीपत्रिका राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रदान केली. सरकार, लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत, अशा शब्दात टोपे यांनी मुलांना आश्वस्त केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या १८ बालकांना, सोलापूर जिल्ह्यातील ४१ मुले, नाशिक जिल्ह्यातील ५५ बालकांना, मुंबई उपनगर जिल्ह्यात १७ बालकांना तर ठाणे जिल्ह्यातील ३० अनाथ बालकांना  साहाय्य प्रदान करण्यात आलं.