देशभरात आज ७०० ठिकाणी राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळा-२०२२ चे आयोजननवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळा-२०२२ चे संपूर्ण देशभरात ७०० ठिकाणी आज आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या कार्यक्रमामुळे देशातली युवापिढी सक्षम बनेल, असं ते म्हणाले. या अप्रेंटिशिपमुळे लोक रोजगार निर्माण करतील. लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल, असं त्यांनी सांगितलं. स्किल इंडिया आणि प्रशिक्षण महासंचालक यांच्या वतीनं हा दिवसभराचा मेळावा होणार आहे. या मेळ्याच्या माध्यमातून १ लाख प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची पुढील शिक्षणासाठी आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या मेळ्यामध्ये देशातल्या ३० विविध क्षेत्रांमधल्या  ४ हजारहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. या मध्ये ऊर्जा, किरकोळ विक्री, वाहन, संगणक, दूरसंचार आदी क्षेत्रांचा समावेश आहे. या औद्योगिक आस्थापनांमध्ये ५०० हून अधिक सेवाक्षेत्रामध्ये जसे की वेल्डर, इलेक्ट्रिशियन, स्वच्छता कर्मचारी आदी प्रकारचे काम मिळणार आहे.