उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांवर ‘आयुष मार्क’ लावलं जाणार - प्रधानमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेल्या उच्च गुणवत्तेच्या दर्जेदार आयुष उत्पादनांवर मार्क अर्थात विशेष आयुष मानचिन्ह  लावलं  जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवनिर्मिती परिषदेचं उद्घाटन आज  मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, fssai नं त्यांच्या नियमांमध्ये आयुष आहार म्हणून एक नवी श्रेणी विकसित केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  

आयुष  उपचारासाठी भारतात प्रवास करायला सुविधा मिळावी या हेतूनं लवकरच विशेष आयुष व्हिसा अशी नवीन श्रेणी सुरु केली जाईल असं  प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आयुष निर्यात प्रोत्साहन मंडळाचं  डिजिटल स्वरूपात उदघाटन झालं.  आयुष इन्फॉर्मेशन हब, आयुष नेक्स्ट, आयुसॉफ्ट असे  आयटी उपक्रमही आज सुरू करण्यात आले. आयुष औषधं, आरोग्यपूरक औषध,  सौन्दर्यप्रसाधनांच्या उत्पादनात अभूतपूर्व तेजी आली आहे,  २०१४ मध्ये या क्षेत्राची उलाढाल  केवळ  ३ अब्ज डॉलर्स होती  आता तिने १८ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे, असं त्यांनी सांगितलं. वनौषधींचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणं आणि सहज बाजारपेठ उपलब्ध होणं आवश्यक आहे, त्यादृष्टीनं केंद्र सरकार, आयुष ई मार्केटच्या  विस्ताराला प्राधान्य देत आहे, असं ते म्हणाले. या परिषदेला मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयासेस, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, विविध देशांचे प्रतिनिधी आणि वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ  उपस्थित होते.