ऑपरेशन गंगातंर्गत गेल्या चोवीस तासात सहा विमानं भारताकडे रवाना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेमधल्या खारकीव शहरातल्या मध्यवर्ती चौकात तसंच कीएवमधल्या दूरचित्रवाणी मनोऱ्यावर रशियानं बॉम्ब वर्षाव केल्यामुळे युद्धस्थिती गंभीर झाली आहे. कीएवमधल्या हल्ल्यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याच युक्रेनच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. या मनोऱ्याजवळ बाबिन यार होलोकॉस्ट स्मारकावर एक शक्तिशाली क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचं अध्यक्ष झेलेन्सकी यांच्या कार्यालयानं सांगितलं आहे. रशियाच्या अनेक रणगाडे आणि इतर वाहनांचा ६४ किलोमीटर लांबीचा ताफा कीएवच्या दिशेनं कूच करत असल्याचं वृत्तसंस्थांच्या बातम्यांमधे म्हटलं आहे. दक्षिणेकडे ओडेसा आणि मारियुपोल इथल्या महत्त्वाच्या बंदरासह युक्रेनमधल्या इतर अनेक शहरं आणि गावांवर लष्करी कारवाई केली आहे. खारकीवमधे फ्रीडम्स स्क्वेअर इथं प्रशासनभवन जवळ झालेल्या हल्ल्यात सहा लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान या युद्धातल्या गुन्ह्यांचा चौकशी करण्याची योजना तयार करत असल्याचं आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या मुख्य वकिलानं सांगितलं. दरम्यान ऑपरेशन गंगातंर्गत गेल्या चोवीस तासात सहा विमानं भारताकडे निघाली असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं. यात पोलंडमधून निघालेल्या पहिल्या विमानाचाही समावेश आहे. ही विमानं १ हजार ३७७ भारतीय नागरिकांना युक्रेनमधून मायदेशी घेऊन येत आहेत, असं जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.