MPSC कडून पुढच्या वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं पुढच्या वर्षी घेतल्या जाणार असलेल्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक आज आयोगानं जाहीर केलं. यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढच्या वर्षी २ जानेवारीला, तर ७, ८, आणि ९ मे २०२२ला मुख्य परीक्षा होणार आहे. दुय्यम सेवा परीक्षांसाठी पुढच्या वर्षी २६ फेब्रुवारीला पूर्व परीक्षा होणार आहे, तर त्याअंतर्गत विविध पदांसाठीच्या मुख्य परीक्षा पुढच्या वर्षी जुलै महिन्यात ९, १७, २४ आणि ३१ तारखेला होणार आहेत. गट क सेवा संयुक्त परीक्षेसाठीची जाहीरात चालू महिन्यात काढली जाणार आहे. तर पूर्व परीक्षा पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. याअंतर्गत विविध पदांसाठीच्या मुख्य परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच्या ६, १३, २० आणि २७ तसंच सप्टेंबर महिन्याच्या १० आणि १७ तारखेला होणार आहेत. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात राज्य सेवा परीक्षांसाठी जाहीरात काढली जाईल, आणि त्यानंतर १९ जुन २०२२ ला पूर्व परीक्षा तर १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२२ला मुख्य परीक्षा घेतली जाईल. जुन २०२२ मध्ये अराजपत्रित दुय्यम सेवा परीक्षांसाठीची जाहीरात निघेल, आणि त्यानंतर ८ऑक्टोबर २०२२ला पूर्व परीक्षा घेतली जाईल. यासाठी मुख्य परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. गट क सेवा संयुक्त परीक्षेसाठीची जाहीरातही पुढच्या वर्षी जून महिन्यात काढली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरीक्षा ५ नोव्हेंबर २०२२ला घेतली जाईल, मात्र मुख्य परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.