देशात ओमायक्रॉनचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्राच्या पाठोपाठ आता दिल्ली आणि राजस्थानमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये टांझानियाहून परतलेल्या व्यक्तिमध्ये हा नवा प्रकार आढळला असून या रुग्णाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी काल माध्यमांना दिली. राजस्थानमध्येही काल 9 नवीन रुग्णांची भर पडली. दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या एकाच कुटुंबातील या रुग्णांना जयपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती आरोग्य विभागाचे सचिव वैभव गलरिया यांनी काल दिली. महाराष्ट्रात पिपंरी चिंचवड मधे सहा आणि पुण्यात एका व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळल्यामुळे राज्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता ८ झाली आहे. त्यामुळे देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता 21 झाली आहे.