ग्राहक येण्याची वाट न पाहता बँकांनी त्यांच्यापर्यंत जावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांनी ग्राहक येण्याची वाट न पाहता त्यांच्यापर्यंत जावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बँकांच्या कर्जपुरवठ्याविषय नवीदिल्ली इथे झालेल्या एका परिषदेच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. बँका या राष्ट्र उभारणीच्या प्रमुख भागीदार आहेत. गेल्या सात वर्षांत सरकारने घडवून आणलेल्या सुधारणांमुळे आज बँका मजबूत झाल्या आहेत आणि त्या जोरावर पुढील झेप घेण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे, असं ते उपस्थित बँक अधिकाऱ्यांना म्हणाले. २०१४ साली सरकारनं बँकिंग क्षेत्राच्या अनेक समस्यांवर विचार करून उपाययोजना सुचवल्या होत्या. थकीत कर्ज वसुली, बँकांचे पुर्नभांडवलीकरण, कर्जवसुली लवाद यासारखे निर्णय घेतले, दिवाळखोरी संबंधात सुधारित कायदे आणले. यामुळे बँकांची भांडवल उपलब्धता आणि ओघाने क्षमताही वाढली. कर्ज बुडवेगिरी करणाऱ्यांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कारवाई केल्यामुळे ५ लाख कोटींहून जास्त कर्ज वसुली झाल्याचं ते म्हणाले. कर्ज पुनर्निधारण कंपनीच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांचे डबघाईला आलेले उद्योग सावरायला मदत होईल, तसंच बँकांवरील कर्जवसुलीची जबाबदारी कमी होईल असंही ते म्हणाले.