शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंतिम संस्कार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीवर शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात आले. आपल्या पूजनीय व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची गर्दी यावेळी झाली होती. पुरंदरे वाडा या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या अंतिम दर्शनासाठीही आज सकाळपासून रांगा लागल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे, गिरीष बापट, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुरंदरे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. पुरंदरे यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी,राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुरंदरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस तसंच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही बाबासाहेवांना आदरांजली वाहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा जगभरात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. वयाची शंभरी गाठणारे बाबासाहेब पुरंदरे न्युमोनियावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. छत्रपती शिवरायांच्या गाथेने भारलेले पुरंदरे यांनी इतिहास अभ्यासक म्हणूनही संशोधनात मोलाची भर घातली होती. कथा, कादंबऱ्या, व्याख्यानं, महानाट्य, गड किल्ल्यांचं पदभ्रमण अशा विविध नवमाध्यमांच्या रुपात शिवचरित्र नव्या पिढीपर्यंत नेलं. विविध माध्यमातली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कथनशैली त्यांच्या शिवशाहीर या बिरुदाला साजेशी होती. २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर २०१९ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.