केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक कोटीव्या वृक्षाचं रोपण केलं. केंद्रीय गृहमंत्रालयातंर्गत येत असलेल्या सर्व सुरक्षादलांनी देशभरात  एक कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला होता. त्याची पूर्तता आज शहा यांच्या हस्ते पिपंळाचं रोप लावून करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलिस दलानं आपल्या स्थापनेपासून प्रत्येक क्षेत्रातल्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. यात सीमासुरक्षा, देशांतर्गत सुरक्षा, दगंलीपासून, नक्षलवाद्यापासून सुरक्षा, जम्मू काश्मीरमधे सुरक्षा देण्याचं काम सीआऱपीएफनं यशस्वीपणे केलं आहे, अशा शब्दात अमित शहा यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा गौरव केला.यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शहा यांनी हैद्राबाद मुक्ती दिनानिमित्त आज या भागातल्या जनतेला भरभरून शुभेच्छा दिल्या तसंच हैद्राबाद मुक्ती संग्रामातले प्रमुख स्वातंत्र्य सैनानी स्वामी रामानंद तीर्थ, गोंविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू आणि देविसिंग चौव्हाण यांच्या नावाचा उल्लेख करून गौरव केला. हुतात्म्यांना अभिवादन केलं.