शाळा सुरु होण्याच्या शासन निर्णयामुळं स्कूल बस आणि व्हॅन व्यावसायिकांना काहीसा दिलासा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या सुमारे 15 महिन्यांपासून शाळा बंद असल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या स्कूल बस आणि व्हॅन व्यावसायिकांना शाळा पुन्हा सुरु होण्याच्या शासन निर्णयामुळं काहीसा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात सुमारे 20 हजाराहून अधिक जण स्कूल बसच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. शाळा बंद झाल्यापासून रोजीरोटीचा प्रश्न त्यांना सतावत होता. मध्यंतरीच्या काळात कोरोनाविषयक निर्बंध काही प्रमाणात दूर झाल्यानंतर घरगुती सहलींसाठी काही खासगी बसगाड्यांचा वापर झाला पण शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या त्यासाठी फारशा सोयीच्या नसल्यानं त्यांचा फारसा वापर झाला नाही. परिणामी त्या मार्गानं मिळणाऱ्या उत्पन्नापासूनही हा व्यावसायिक वर्ग वंचित राहिला. वर्षभरातून अधिक काळ गाड्या जागेवरच थांबून राहिल्यानं त्यांच्यात अन्य काही स्वरूपाचे तांत्रिक बिघाडही झाले आहेत. आता पुढील मंगळवारपासून शाळा पुन्हा सुरु होत असल्यानं स्कूल बसच्या किरकोळ दुरुस्तीची कामं पूर्ण करून घेण्यावर भर दिला जाऊ लागला आहे.शहरातील केवळ आठवीपासूनचे वर्ग सुरु होत आहेत तर ग्रामीण भागात पाचवीपासूनचे वर्ग सुरु होत असल्यानं मर्यादित प्रमाणातच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरु होणार आहे पण अगदीच घरात बसून राहण्यापेक्षा रोजीरोटीसाठीचं काहीतरी काम सुरु होईल यातच या व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त होत आहे