इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसंच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसंच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले. ते काल वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, इतर मागास आणि  बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयासाठी सामाजिक न्याय विभागानं सामाजिक न्याय भवनात जिथे जागा उपलब्ध आहेत तिथे जागा उपलब्ध करून द्यावी. विभागाच्या योजना, शिष्यवृत्ती यासह आवश्यक निधी बाबत प्राधान्यक्रम निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. कल्याणकारी योजनांकरता, तसंच शिष्यवृत्तीसाठी, वसतिगृहांसाठीचं अनुदान तसंच विविध महामंडळांसाठीही निर्धारित केलेला निधी मिळावा, अशी मागणी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी महाज्योती संस्थेसाठी आकृतिबंधानुसार पदभरती, आश्रमशाळांसाठी आवश्यक पदभरती याबाबतही चर्चा झाली.