मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यावर अजूनही घोंगावत आहे मात्र या काळातही बाल संगोपन आणि सुपोषण नियमितपणे आणि सुयोग्यरित्या व्हावे यासाठी राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राबविल्या गेलेल्या ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ या मोहिमेमुळे लाखो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. व्हाट्सअप चॅट, प्रत्यक्ष फोन याद्वारे हजारो लाभार्थ्यांनी माहिती घेऊन समुपदेशन आणि इतर बाबींचे योग्यरित्या नियोजन केले आहे त्यामुळे आता तरंग सुपोषणाच्या माध्यमातून 8080809063 हा मोबाईल क्रमांक परवलीचा क्रमांक ठरला आहे.
‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात ‘आयव्हीआर हेल्पलाइन’, व्हाट्सअप चॅट बोट, ब्रॉडकास्ट फोन आणि संदेश प्रणाली तसेच ‘एक घास मायेचा’, ‘आजीबाईच्या गुजगोष्टी’ या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. महामारीच्या काळातही संभाव्य लाभार्थ्यांशी संवाद सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाचा ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा एक उत्कृष्ट डिजिटल उपक्रम आहे. टॅली न्यूट्रिशनच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे कारण आपण आपल्या एका बोटाच्या क्लीकवर पोषण आणि मुले, गर्भवती महिला, स्तनपान करणारी माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित माहिती मिळवू शकता. वयानुसार पोषण समुपदेशन सीडी आणि प्री स्कूल ईसीसीई उपक्रमाद्वारे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी घरी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे व्यासपीठ अत्यंत प्रभावी म्हणून काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया या विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात ‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’ ही संकल्पना राबवताना सशक्त महिला, चांगल्या पोषित महाराष्ट्रासाठी सर्वांगीण विकसित मुले हे ध्येय साध्य करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयव्हीआर हेल्पलाईनच्या क्रमांकावरून पोषण आणि बालकांच्या संगोपनाच्या संदर्भातील विविध पैलूबाबत आधी रेकॉर्ड केलेले संदेश पाठवण्यात येतात. या संदेशासाठी त्यांचे अभिप्राय देखील पाठवू शकतात. आतापर्यंत या माध्यमातून 15 लाख 76 हजार 300 दूरध्वनी करण्यात आलेले आहेत. तर चार लाख 58 हजार 995 लघुसंदेश पाठवण्यात आले आहेत. व्हाट्सअप चॅटबोटच्या माध्यमातून आतापर्यंत दहा लाख 12 हजार 407 लाभार्थ्यांनी प्रतिसाद नोंदवला आहे तर आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 52 हजार 295 जणांपर्यंत संदेश पोहोचला आहे. ब्रॉडकास्ट कॉलला उत्तर देणाऱ्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 6 लाख 5 हजार इतकी आहे तर प्रति वापराची सरासरी वेळ दीड मिनिटांची आहे. ब्रॉडकास्ट संदेश 6 लाख 30 हजार 841 जणांना पाठवण्यात आलेत.
‘एक घास मायेचा’ या उपक्रमांतर्गत महामारी आणि त्यानंतरच्या टाळेबंदी कालावधीमध्ये मुलांच्या आहाराकडे दुर्लक्ष होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गर्भवती महिलांसाठी विविध पौष्टिक पाककृती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या. ‘एक घास मायेचा’ याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. स्तनपान करणारी माता आणि स्वच्छता पद्धती आणि प्रतिसादात्मक आहार याबाबत सहाय्यक मार्गदर्शन असलेले हे व्हिडिओ व्हाट्सअप चॅटबोटसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले आहे.
‘आजीबाईंच्या गुजगोष्टी’ या आणखी एका उपक्रमाद्वारे मुलाच्या पहिल्या एक हजार दिवसांशी संबंधित विविध समज-गैरसमजांचे निरसन करण्यासाठी एक ॲनिमेटेड चित्रफीत मालिका तयार करण्यात आली आहे. ही मालिका घराघरात पोहोचून गैरसमज आणि महामारीमुळे निर्माण झालेल्या भीतीवर मात करणारी आहे. ही मालिका व्हाट्सअपद्वारे प्रसार करण्यासह सोशल मीडियाच्या माध्यमातून सात हजारांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.