राज्यात पुन्हा मान्सूनसाठी पोषक वातावरण, सर्वच भागात चार दिवस पावसाचे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पुन्हा मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तविला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून काल पिवळ्या रंगाचा बावटा जारी करण्यात आला. संबंधित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कोकणात काल सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ सरींनी हजेरी लावली. आजही कालच्या सारखंच पाऊसमान अपेक्षित आहे. मात्र विदर्भात पावसाचं क्षेत्र काहीसं विस्तारेल. उद्यापासून राज्यातल्या पाऊसमानात वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.