कापूस खरेदी प्रक्रिया आणखी सुलभ करणं गरजेचं- बाळासाहेब पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासणं आवश्यक असून त्यासाठी कापूस खरेदी प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित राबवली पाहिजे. असं मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते काल महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामध्ये समायोजन करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी सहकार आणि पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे, आदी मान्यवर उपस्थीत होते. २०११ पासून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ यांचे एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या दुसऱ्या एका बैठकीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण, विक्रीयोग्य उत्पादनांच्या प्रभावी हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी विपणनाच्या पायाभूत सुविधांचा विकास, शेतमालाची साफसफाई, प्रतवारी करुन तात्पुरती साठवणुक, फळे, भाजीपाला आणि फुले या सारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.