कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी सदस्यांनी आजही गदारोळ केला.

त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. थोड्याच वेळ्यापूर्वी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.लोकसभेत आज सकाळी या विषयांवरुन विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. हेरगिरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी त्यांची मागणी होती. त्यातच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास चालवण्याचा प्रयत्न केला. कामकाज चालू द्यावं, असं ते विरोधी सदस्यांना सांगत होते.

मात्र त्याचा उपयोग झाला नाही. गोंधळ कायम राहिला. त्यामुळे कामकाज दुपारपर्यंत तहकूब झालं. तत्पूर्वी, तोक्यो ऑलिंम्पिकसाठी गेलेल्या भारतीय चमूला बिर्ला यांनी सभागृहाच्या वतीनं शुभेच्छा दिल्या.दुपारी १२ वाजता पुन्हा कामकाज सुरु झाल्यावरही कॉंग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली.  गोंधळ वाढत गेल्यानं अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झालं.राज्यसभेतही आज या मुद्यांवरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू राहिली.‌

तृणमूल काँग्रेसचे सदस्य शांतनू सेन यांनी काल सभागृहात बेशिस्त वर्तन केल्याबद्दल त्यांना निलंबित करत असल्याची घोषणा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केली. त्यावर काही विरोधी सदस्यांनी आक्षेप नोंदवला. घोषणाबाजीही सुरुच होती. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. सभागृहाचं कामकाज सातत्यानं बाधित होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.‌विरोधी नेत्यांनी आपल्या भूमिकेबाबत विचार करावा, असं ते म्हणाले.

त्यानंतर कामकाज सुरु झालं तेव्हा निलंबित सदस्य सेन यांनी सभागृहातून निघून जायला नकार दिल्यानं उपाध्यक्ष हरीवंश यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. मात्र त्यानंतरही उपाध्यक्षांनी वारंवार सांगूनही सेन यांनी बाहेर जायला नकार दिला. त्यामुळे हरीवंश यांनी दुपारी अडीचपर्यंत कामकाज तहकूब केलं.