विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या तीन मुद्यांवर कारवाई करण्याचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विरोधी पक्षनेत्यांच्या मागण्यांवर कारवाई करावी, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळानं बुधवारी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यावी, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढं ढकलाव्यात, अशा मागण्यांचे निवेदन त्यांनी दिलं. त्यावर कार्यवाही करावी आणि त्याबाबत आपल्याला माहीती द्यावी, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.