संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंधन दरवाढ आणि कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी विरोधकांचा गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेच्या  कामकाजात  विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे अडथळे आले. इंधन दरवाढ, कृषी कायदे आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्र घेत सातत्याने घोषणाबाजी केल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. लोकसभेत आज कामकाज सुरु होताच लोकसभेच्या दिवंगत ४० माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रथेनुसार मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्या मंत्र्यांचा परिचय सदनाला करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उभे राहिले असता, विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी सुरु केली. मंत्रिमंडळात मागासवर्गीय, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आणि अधिक महिलांचा समावेश झाल्यामुळे सर्वांनी त्यांचे उत्साहाने स्वागत करणे अपेक्षित असताना, घडलेला प्रकार अनुचित असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. कोणत्याही मुद्द्यावर चर्चेची केंद्र सरकारची तयारी असल्याचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगूनही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

राज्यसभेतही इंधन दरवाढ आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी  स्थगित करण्यात आले. कोरोना विषाणुच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या संक्रमणाला तोंड देण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे असे सांगून देश एकजुटीने या आव्हानाला सामोरा जाईल असा विश्वास राज्यसभेचे अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. देशातले नागरिक गेले वर्ष दीड वर्ष, कोरोना संकटामुळे चिंतेत असताना संसदेकडे मोठ्या आशेने पाहत आहेत, त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणे हि आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतही विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळाविषयी खंत व्यक्त केली. विरोधकांच्या गदारोळातच, नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नौवहनासंदर्भात सामुद्रिक सहाय्यता विधेयक मांडले. याचा उद्देश देशात नौवहन क्षेत्राचा विकास, देखरेख आणि व्यवस्थापनाकरता आराखडा तयार करणे असा आहे. तत्पूर्वी राज्यसभेत कामकाज सुरु होताच दिवंगत सदस्य डॉ रघुनाथ मोहपात्रा आणि राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  याशिवाय अभिनेते दिलीप कुमार आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांच्यासह दहा माजी सदस्य आणि विख्यात धावपटू मिल्खा सिंग यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नायडू यांनी पियुष गोयल यांची राज्यसभेचे नवे नेते म्हणून औपचारिक परिचय करून दिला. तर राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेले केरळचे अब्दुल वहाब यांनी शपथ घेतली.