स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्रानं 48 हजार कोटी रुपये तर खेलो इंडिया उपक्रमासाठी 1,756 कोटी रुपये केले खर्च

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नंतर कामकाज सुरु झाल्यावर केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. या योजनेत केंद्राचा सहभाग 48 हजार कोटी रुपयांचा असल्याचं त्यांनी सांगितलं. तर खेलो इंडिया उपक्रमावर आत्तापर्यंत सरकारनं 1,756 रुपये खर्च केल्याची माहिती क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. मात्र, नंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी 2.00 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या दिवसाचं कामकाजही विरोधकांच्या गोंधळातच सुरु झालं. आजच्या  आणि गेल्या काही दिवसातील विरोधकांच्या कृतीची दखल घेत लोकसभेमध्ये सभापती ओम बिर्ला यांनी निवेदन केलं. संसदेच्या परंपरेला काळिमा लागेल अशी कृती सदस्यांनी करू नये. सदनाची प्रतिष्ठा कायम राखणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आणि  संघटीत विचारांची गरज आहे, असं त्यांनी सदस्यांना उद्देशून सांगितलं. सदनात विपरीत घटनांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, अन्यथा पुन्हा अशा प्रकारे गोंधळ घालत सदनाच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बिर्ला यांनी दिला. त्यानंतर सदनाचं कामकाज सकाळी साडेअकरा पर्यंत स्थगित करण्यात आलं. 

राज्यसभेत अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस या मुद्यांवर चर्चेची मागणी अमान्य केली. त्यामुळे विरोधी सदस्यांनी गदारोळ केल्यानं अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केलं.