नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातल्या गेल इंडिया आणि ऑस्ट्रेलियातल्या वितारा एनर्जी या कंपन्या राज्यात गुंतवणूक करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातल्या गेल इंडिया, आणि ऑस्ट्रेलियातल्या वितारा एनर्जी या कंपन्या राज्यात सुमारे १६ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

याबाबतचा सामंजस्य करार काल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.त्यानुसार, गेल इंडिया रायगड जिल्ह्यात उसर इथल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. त्यासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याठिकाणी ३०० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, तसंच कामगारवर्गात पाच हजार जणांना रोजगार मिळणार आहे.

दुसरा सामंजस्य करार ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी लिमिटेड कंपनीसोबत केला आहे. किमान कार्बन तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक वायु निर्मितीसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यात ही कंपनी प्रकल्प सुरू करणार आहे.

जैवइंधन निर्मितीसोबत हायड्रोजन, रिन्यूएबल डिझल, एव्हीएशन फ्युअल, बायो सीएनजी, इथेनॉल निर्मिती आदी क्षेत्रात काम करणार आहे. पर्यावरण पूरक, आणि सर्वांसाठी किफायतशीर उत्पादनं निर्माण केली जातील, असं कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलं. या प्रकल्पासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक क्लिव स्टिफन्स यांनी स्पष्ट केलं.

यावेळी कंपनीचे संचालक आणि सीईओ सुभाष बोस उपस्थित होते. २०२२ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वीत होणार आहे.देश-विदेशातल्या गुंतवणुकदारांनी यापूर्वी तीन टप्प्यात राज्य शासनासोबत सुमारे १ लाख १२ हजार कोटी रुपयांचे करार केले आहेत.

गेल इंडिया आणि वितारा कंपनीच्या गुंतवणुकीमुळे हरित उर्जा निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.