गडचिरोलीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत १३ नक्षली ठार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातल्या जंगलात आज सकाळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत १३ नक्षली अतिरेकी मारले गेले. पयडी-कोटमी जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. नक्षल्यांनी आज सकाळी पोलिस दिसताच त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने नक्षली जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता १३ नक्षल्यांचे मृतदेह सापडले. शिवाय नक्षल्यांकडील बंदुका, पुस्तके आणि दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठार झालेले नक्षली कसनसूर दलमचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.