महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक केले. गर्दीला अटकाव घालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आज रात्री आठ वाजल्यापासून येत्या 1 मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील. जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला आदीची दुकानं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरु राहतील.तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,महानगरपालिकांची परिवहन सेवा, रिक्षा या सारख्या सेवाही सुरु असतील.

मुंबईतील रेल्वे सेवासुद्धा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठीच सुरु राहील. खासगी वाहनंसुद्धा पन्नास टक्के क्षमतेनं चालवता येतील. मात्र फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांचा वापर करता येईल. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही केवळ नातेवाईकांचं आजारपण किंवा अंत्यसंस्कार या कारणांसाठीच दुसऱ्या शहरात जाता येईल.

या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांना चौदा दिवसांसाठी गृह विलगीकरणात रहावं लागेल. कोरोना साथ नियंत्रण व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयं वगळता अन्य सरकारी कार्यालयांमध्ये फक्त पंधरा टक्केच उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती ठेवता येईल. तर लग्न समारंभाला केवळ पंचवीस जणांच्या उपस्थितीला आणि फक्त दोन तास इतक्याच वेळेसाठी परवानगी देण्यात आली आहे.