कोरोनाची साथ झपाट्यानं पसरण्याला बेजबाबदार वागणंच कारणीभूत - डॉक्टर हर्षवर्धन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड -19 रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 बद्दल लोकांमधील बेजबाबदारपणामुळे तसंच ढिसाळपणे वागण्यामुळे अचानक मोठी रुग्ण वाढ होत आहे, हे थांबायला हवं असं ते म्हणाले. कोविड -19 संदर्भातील मंत्रिगटाच्या चर्चेत ते बोलत होते. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत असे हर्षवर्धन म्हणाले.

देशभरात 15 हजार स्वतंत्र आरोग्य केंद्र कार्यरत असून जवळपास 18 लाखाहून अधिक खाटा कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात लसीकरण वेगानं सुरू असून आतापर्यंत नऊ कोटी 43 लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत असं ते म्हणाले. भारतानं आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 8 कोटी 45 लाख मात्रा 84 देशांना पाठवल्या आहेत.