राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्यूसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या कोरोना स्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, आदींबरोबर संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करायला सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनं ही लक्षात घेण्याची गरज आहे. जनतेनं ही कोविड नियम पाळले नाही, तर नाईलाजानं येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची  अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा आणि पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी.  व्हेंटिलेटर्स, आय.सी.यु आणि ऑक्सीजन खाटांची संख्या वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.