प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत राज्याला देशपातळीवर प्रथम क्रमांक पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राज्यानं देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार मिळाला आहे.

शेतकरी सन्मान  योजनेला २ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं या योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारं राज्य आणि निवडक जिल्ह्यांचा सत्कार उद्या नवी दिल्ली इथं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत १ कोटी १४ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटी ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी ५ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला ४ लाख ६८ हजार ७४७ शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. त्यातल्या ९९ पूर्णांक ५४ शतांश टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून महाराष्ट्रानं देशात प्रथम क्रमांकाचं काम केलं आहे.

राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास ३८ हजार ९९१ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यापैकी २३ हजार ६३२ तक्रारींचा निपटारा केल्यानं राज्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे.

पुणे जिल्ह्यानं २ हजार २७८ तक्रारींपैकी २ हजार ६२ तक्रारींचा निपटारा करून, तर अहमदनगर जिल्ह्यानं लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत २८ हजार ८०२ लाभार्थ्यांची १०० टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय काम केलं आहे.

अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचा गौरव होणार आहे, याबद्दल कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विभागाचं कौतुक केलं आहे.