मुंबई : विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण उपस्थित राहत असलेल्या दीक्षान्त समारंभांमध्ये बहुतांशी सुवर्ण पदके विद्यार्थिनी जिंकत असतात. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राज्याच्या दहापैकी दहाही महिला कॅडेट्सची प्रतिष्ठेच्या संचलनासाठी झालेली निवड ही तितकीच अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगून महिलांच्या कामगिरीचा सर्वच क्षेत्रांमध्ये उंचावणारा आलेख देशाकरिता शुभलक्षण आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केले.
नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्याची मान उंचावणारी कामगिरी केल्याबद्दल राज्यातील एनसीसी छात्रांना राज्यपालांनी राजभवन येथे निमंत्रित करून सन्मानित केले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी तसेच सेनादलांचे अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
भारतीय सैन्य दलांबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात आदराचे स्थान आहे. गलवान खोरे सारख्या दुर्गम ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी आपली सैन्यदले सज्ज आहेत. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त व सर्वधर्मसमभावाचे संस्कार मिळत असतात. त्यामुळे भविष्यात जीवनात कुठल्याही क्षेत्रात कार्य करीत असले तरीही विद्यार्थ्यांनी शिस्तीचे संस्कार कायम ठेवावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
वीज, पाणी ही राष्ट्राची सार्वजनिक संपत्ती असून कोठेही वीज अथवा पाणी वाया जात असेल तर अशी नासाडी थांबवणे ही देखील देशसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील २६ एनसीसी कॅडेट्सपैकी २४ कॅडेट्सची राजपथ संचलनासाठी निवड झाली तसेच महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला द्वितीय सर्वोत्तम संचालनालयाचा मान मिळाल्याचे मे.जन. खंडुरी यांनी यावेळी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी कॅडेट आयुषी गजानन नागपूरकर, ज्योती रुकवल, नाजुका कुसराम, मनदीपसिंग सिलेदार, अमोद माळवी, रामचंद्र अशोक चव्हाण, सोहम रोहडे व मयूर मंदेसिया या कॅडेट्सचा सत्कार करण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.