जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न, जल संवर्धनात जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी नेहरु युवा केंद्राने पुढाकार घ्यावा--जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 


पुणे:  जल संवर्धनामध्ये जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी नेहरु युवा केंद्राने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

नेहरु युवा केंद्राच्या वतीने युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. सुरवातीला जिल्हास्तरीय 'कॅच द रेन' अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे अजय शिंदे, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी प्रसाद सोनावणे उपस्थित होते.

बैठकीत जिल्हास्तरीय युवा मंडळांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षीचा प्रथम वर्षाचा पुरस्कार ग्रामीण तंत्रज्ञान संस्था- नाव्हारे, द्वितीय पुरस्कार तथागत बहुउद्देशीय संस्था, पुणे आणि तृतीय क्रमांक अरुणदादा बेल्हेकर बहुउद्देशीय संस्था यांना घोषित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी देशमुख यांनी उपस्थितांना 'राष्ट्रीय जल' शपथ दिली. पुणे जिल्ह्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुरस्कार दिलेल्या चेतन परदेशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जिल्ह्यात पानी फाउंडेशनच्या वतीने “समृद्ध गाव योजना” उपक्रम सुरु असणाऱ्या गावांना कॅच द रेन (पावसाचे पाणी साठवा )  उपक्रमाशी जोडायला हवे.  गावांमध्ये ‍छतावर, शेतात व गावाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठविण्याबाबत व्यापक जनजागृती करावी, जेणेकरुन जमिनीतील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होईल.

जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर म्हणाले, जलसंसाधन मंत्रालय आणि युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 700 जिल्ह्यांमध्ये ‘कॅच द रेन’ (पावसाचे पाणी साठवा ) ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातील 100 गावांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत गावातील किमान 100 कुटूंबांना छतावर पडणारे, शेतात पडणारे तसेच गावाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हा युवा अधिकारी यांनी नेहरु युवा केंद्राचा आर्थिक वर्ष २०२० -२०२१ चा अहवाल सादर केला. कार्यक्रम सहाय्यक सिद्धार्थ चव्हाण यांनी आभार मानले. बैठकीला विद्यार्थी सहायक समितीचे तुषार रंजनकर, गोखले इस्टिट्यूटच्या हेमांगी मोरे, सल्लागार समितीचे सदस्य हितेंद्र सोमाणी, शंतनू जगदाळे, रसिका कुलकर्णी, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक वैभव अलई तसेच नेहरु युवा केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image