राज्यभरातल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १५ जानेवारीला झालेल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणचे निकाल जाहीर होत असून संध्याकाळपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे.अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या आदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणूकीत पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलनं सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. ३० वर्षानंतर तिथं निवडणूक झाली.

माजी मंत्री भाजपा नेते राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपाच्या पॅनलचा पराभव झाला. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ पैकी सात जागा जिंकत सत्ता परिवर्तन केलं. राहाता तालुक्यातल्या लोणी खुर्द गावात सत्तांतर झालं आहे. तिथं १७ पैकी १३ जागा जिंकत जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलनं बहुमत मिळवलं आहे. २० वर्षानंतर हे सत्तांतर झालं असून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना हा धक्का मानला जात आहे.

सांगली जिल्ह्यात १४२ पैकी ८४ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यात काँग्रेस पॅनल -३७, राष्ट्रवादी पॅनल -१३, शिवसेना पॅनल - १९, भाजपा पॅनल - ७, तर स्थानिक आघाड्यांनी ७ ठिकाणी सत्ता मिळवली आहे. एका ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रित सत्ता मिळवली आहे. म्हैसाळमध्ये भाजपाचे दीपक बाबा शिंदे गटानं १५ जागा जिंकून सत्ता मिळवली, राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त २ उमेदवार विजयी झाले.

कडेगाव तालुक्यातल्या सर्व ९ आणि पलूस तालुक्यातल्या १२ ग्रामपंचायतींवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तिथं भाजपचा धुव्वा उडाला असून, कृषी राज्य मंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे.

खानापूर आणि आटपाडीमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालं आहे.

सांगली जिल्ह्यात एकूण १५२ ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी १० ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या. त्यात राष्ट्रवादी - १, भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्रित सत्ता ३, सर्वपक्षीय स्थानिक आघाडी - १, शिवसेना राष्ट्रवादी आघाडी - १,  शिवसेना - १, तर काँग्रेसनं ३ ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत.

अकोला जिल्ह्यात भाजपाचे १७२ ग्रामपंचायत सदस्य आतापर्यंत विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पातूर तालुक्यातल्या सस्ती गावात १३ पैकी ९ जागांवर शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत. तर, पळसो बढे ग्रामपंचायतीत १३ पैकी ९ जागांवर भाजपा पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने संजय धोत्रे यांनी पुन्हा गड राखला आहे.

धुळे तालुक्यातील ६६ पैकी अनेक ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थक उमेदवार आणि काँग्रेसच्या पॅनलचा बहुमतानं विजय झाल्यानं काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह आनंद व्यक्त करीत जल्लोष साजरा केला. शिंदखेडा तालुक्यातल्या कर्ले ग्राम पंचायतीत भाजपाला ९ तर महाविकास आघाडीला २ जागा मिळाल्या.  चिमठावळ ग्राम पंचायतीत ७ पैकी ४ जागा भाजपाला मिळाल्या. 

शिंदखेडा तालुक्यात सोनशेलू ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये चिठ्ठी टाकून विजयाचा निर्णय घ्यावा लागला. कमलबाई नानाभाऊ गिरासे आणि म्हसदे रत्ना मनोहर यांना प्रत्येकी १६४ अशी समान मते पडली. म्हणून एका लहान मुलीनं चिट्ठी काढली. यात रत्ना म्हसदे विजयी झाल्या आहेत.

साक्री तालुक्यातल्या म्हसदी ग्रामपंचायत शिवसेनेकडे गेली आहे. चंद्रकांत देवरे यांच्या पॅनलला १३ जागा मिळाल्या आहेत, तर माजी सरपंच सतीश देवरे यांच्या पॅनेलला तीन जागा आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. साक्री तालुक्यात मालपुर कासारे ग्राम पंचायतवर भाजपानं झेंडा फडकावला.

११ पैकी ६ जागा जिंकत, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश पाटील यांचं पॅनल विजयी झालं.

गोंदीया जिल्ह्यात माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कोदामेडी गावात ९ पैकी ५ जागा भाजपाला, तर ४ काँग्रेसला मिळाल्या. मात्र राजकुमार बडोले यांचे चुलत भाऊ मैपाल बडोले यांचा पराभव झाला असून या ठिकाणी काँग्रेसचे युवा उमेदवार निशांत राऊत विजयी झाले आहेत.

गोंदीया तालुक्यात रावनवाडी ग्राम पंचायतमध्ये ११ पैकी ८ जागांवर भाजपा, तर ३ ठिकाणी अपक्ष आमदार विनोद आग्रवाल यांच्या चाबी प्यानलला विजय मिळाला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सीलेझरी ग्राम पंचायतीत ९ पैकी ९ जागा राष्ट्रवादी समर्थित प्यानलनं जिंकल्या आहेत. हा माजी मंत्री बडोले यांना धक्का मानला जात आहे. गोंदीया शहराला लागुन असलेल्या फुलचुर ग्राम पंचायतीमध्ये १३ पैकी ८ जागा जिंकून भाजपा समर्थीत विकास आघाडीनं बहुमत मिळवलं, तर ५ जागांवर अपक्ष उमेदवार आले निवडून आले आहेत.

तीरोडा तालुक्यात पालडोगरी ग्राम पंचायतीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. १० पैकी फक्त १ जागा भाजपाला मिळाली. ९ जागावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थीत ग्राम विकास प्यानलचा विजय झाला आहे.  नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात तिसगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला धक्का बसला आहे, तिथं शिवसेनेनं बाजी मारली आहे. तर,  पालखेड, चिंचखेड इथं शिवसेनेला धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे.

सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात धनगरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत २ प्रभागात  मतदारांनी नोटाला सर्वाधिक पसंती दिली. तिथं ७ जागा होत्या. पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या, तर २ जागा अर्जच दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या. उर्वरित २  जागांसाठी निवडणूक झाली. मतमोजणीत २ जागांवरच्या उमेदवारांऐवजी मतदारांनी एका प्रभागात २११ तर दुसऱ्या प्रभागात २१७ मतं नोटाला दिली.  यामुळे तिथल्या ४ जागांसाठी पुन्हा निवडणूक जाहीर होण्याची चिन्हं आहेत.

वाशिम जिल्ह्यात मांगुळ  ग्रामपंचायतीवर  काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या पॅनलनं ९ पैकी ९ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. तर, गोभणी इथं माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या जनाविकास आघाडीला ११ पैकी  ७ जागा मिळाल्या आहेत. रत्नागरी जिल्ह्यातल्या ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची  मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवारांचं वर्चस्व दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ७० पैकी ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज सकाळी १० वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात ४९४ जागांसाठी १ हजार ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दरम्यान जिल्ह्यातल्या ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपकडे आल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील ७8 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणीला दुपारी अकरा वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरूवात झाली. जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसीलदार कार्यालयात ही मतमोजणी सुरू असून निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी बंदी घातलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी २२ जानेवारीला होणार आहे.