ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी नाबार्डनं अधिक लक्ष द्यावं - उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी नाबार्डनं अधिक लक्ष द्यावं, राज्यातल्या अविकसीत विभागांना अधिकचा निधी देताना संपूर्ण राज्यात समतोल निधी वाटप राहील याकडे लक्ष द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल, नाबार्डनं तयार केलेल्या २०२१-२२ च्या राज्य पत पुरवठा आराखडा फोकस पेपरचं प्रकाशन करताना बोलत होते. पतपुरवठ्याच्या फोकस पेपर प्रमाणे उद्दिष्टपूर्तीची माहिती देणारा पेपर तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

पतपुरवठा आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्ग काढण्यासाठी दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा आणि अमंलबजावणीला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.नाबार्डच्या २०२१-२२ च्या वार्षीक पतपुरवठा नियोजन आराखड्यात कृषी, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासह इतर प्राधान्याच्या प्राथमिक क्षेत्रासाठी ५ लाख ९४ हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी ८ टक्क्यांची वाढ दर्शवली आहे. त्यात कृषी क्षेत्रासाठी १ लाख २७ हजार कोटी, तरलघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग क्षेत्रासाठी ३ लाख ४८ हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.

अन्य क्षेत्रांसाठी म्हणजे शिक्षण, गृहनिर्माण, सामाजिक संरचना, निर्यात यासारख्या क्षेत्रांसाठी १ लाख १८ हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. बहुतांश बँकांनी शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज देताना उद्दीष्टपूर्ती केली नाही. यावर्षी सर्वच बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना उद्दीष्टपूर्तीसाठी प्रयत्न करावा आणि शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी बँकांच्या प्रतिनीधींना केलं.

सौर कृषीपंपांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या हिश्यापोटीची रक्कम नाबार्डनं द्यावी, असंही त्यांनी सुचवलं. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, तसंच नाबार्ड, रिझर्व्ह बँक, राज्य बँकर्स समिती, यांचे अधिकारी- प्रतिनीधी, उपस्थित होते. बँकांनी खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज देताना ते हंगाम सुरू होण्यापूर्वी वेळेत उपलब्ध करून द्यावं, असं कृषीमंत्री भुसे यांनी सांगितलं.