राज्यात ऑनलाईन सुरु असलेले इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरु असलेले इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून प्रत्यक्ष सुरु झाले. मुंबईसह काही ठिकाणी अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

नाशिक जिल्ह्यात बहुतांश शाळांमधे आज पाचवी ते आठवीचे वर्ग भरले. आज सुरू झालेल्या शाळांना पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात ४ जानेवारीपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यानंतर आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आलं होत. आज सकाळी मुलांचे ताप मोजून आणि सॅनिटायझरनं हात स्वच्छ करून प्रवेश देण्यात आला. सुरक्षित अंतर पाळून शाळा सुरू झाल्या. अनेक शाळांमध्ये सजावट करून तसेच रांगोळ्या काढून मुलांचे स्वागत करण्यात आलं.

धुळे जिल्ह्यात ५३३ शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. धुळे शहरातल्या कमलाबाई कन्या शाळेत आज दुपारी ११ वाजता पाचवी ते आठवीचे वर्ग भरले. त्यापुर्वी शाळेत आलेल्या विद्यार्थिनींची शिक्षिकांनी थर्मल तपासणी करत, कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. ९ महिन्यानंतर शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. शाळांमध्ये वर्गात ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं दिली.

वाशीम जिल्ह्यातल्या शाळांमधे इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचं पालन करत सुरू झाले. या वेळी विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. ग्रामीण भागातील शाळांमधील उपस्थिती चांगली असली तरीही जिल्ह्यात काल खासदार आणि आमदार यांच्या वादामुळे झालेल्या तणावाचा परिणाम शहरी भागातल्या शाळांमधल्या विद्यार्थी उपस्थितीवर दिसून आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शाळांनी सर्व वर्ग निर्जंतुक करून मुलांचं थर्मल स्कॅन आणि ऑक्सिजन लेवल तपासून वर्गामधे प्रवेश दिला. ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावून हे वर्ग सुरू राहणार असून संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचं संमतीपत्र घेऊन हा प्रवेश दिला जात आहे.

परभणी, जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधे पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले होते. त्यानुसार आजपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे प्रत्यक्ष वर्ग सकाळी सुरु झाले. परभणी शहरातल्या सर्व शाळा यामुळे गजबजून निघाल्या. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचं तापमान मोजलं गेलं, तसंच सॅनीटायझरनं हात धुऊन घेतले जात होते. त्यानंतरच शाळेत विद्यार्थी शाळेत प्रवेश करत होते. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्क घालूनच शाळेत यावं, त्याचबरोबर शाळांनी कोविड-१९च्या नियमांचं काटेकोर पालन करावं, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. त्या सर्व वर्गाना विद्यार्थी उपस्थित राहत असून संख्या पूर्ण असल्याचं शिक्षण विभागानं सांगितलं. मुंबईत पुढचा आदेश येईपर्यंत शाळा बंदच राहतील, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दोन आठवड्यांपूर्वी दिले होते.

हिंगोली जिल्ह्यातील एकाही शाळेमध्ये इयत्ता  पाचवी ते आठवीचे वर्ग  सुरू झाले नाहीत. शिक्षकांच्या आर. टी.पी.सी.आर. चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तो अहवाल,पालकांचं संमतीपत्र , शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन शिक्षण आधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं काम सुरु आहे. लेखी परवानगीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत.आजपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांकडे एकाही शाळेचा प्रस्ताव परवानगीसाठी दाखल झाला नसल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचं दिसतं, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.