महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्याचे गृहमंत्र्यांनी केले अभिनंदन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन वर्षाच्या कार्यक्रमांस महाराष्ट्रात कोठेही गालबोट लागले नाही याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलाच्या या कार्याचे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

कोणताही सणवार असो महाराष्ट्र पोलिस नेहमीच सतर्क राहून जनतेला पारंपरिकरित्या ते साजरे करता यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. त्याचप्रमाणे नवीन वर्षसुध्दा नागरिकांना त्यांच्या कुटुंबासोबत साजरे करता यावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज होते.

मग ते मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर असो वा शेवटच्या टोकाच्या गडचिरोली जिह्यातील पोलीस दल असो. एकूणच काय तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने बंदोबस्त केला. त्यामुळे नवीन वर्षास कोणतेही गालबोट लागले नाही असं देशमुख यांनी सांगितलं.