इनाम-धामणी येथील प्रलंबित पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा – अध्यक्ष नाना पटोले

  इनाम-धामणी येथील प्रलंबित पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा – अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : मिरज तालुक्यातील इनाम-धामणी येथील 24 तास पाणीपुरवठा योजनेस गती देऊन एका महिन्याच्या आत योजना पूर्णत्वास न्यावी. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या या योजनेस जबाबदार संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

विधानभवन येथे सांगली जिल्ह्यातील इनाम-धामणी येथील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी, मिरजचे उपविभागीय अधिकारी बी.एस.महाजन, विठ्ठल पाटील, आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले म्हणाले, मागील अनेक वर्षे पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित आहे. अत्याधुनिक मीटर यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. योजनेचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. निधी उपलब्धतेनंतर योजना राबविण्यात गैरकारभार झाल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात यावी. प्रलंबित असलेली योजना एका महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिले.