सामाजिक समरसतेचे प्रतिक असणारे श्री राम मंदिर.....विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे

 

मकरसंक्रातीपासून ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी समर्पण व जनजागरण अभियान’ सुरु

पिंपरी : श्रध्दा, भक्ती, अस्मितेचे आणि आस्थेचे स्वाभिमानाचे प्रतिक असणारे भगवान श्री रामाचे मंदिर अयोध्येत उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी समर्पण संकलन निधीत सहभाग घ्यावा. सामाजिक समरसतेचे प्रतिक असणारे हे श्री राम मंदिर आदर्श रुपाने राहणार आहे. यासाठी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे अराजकीय संपर्क अभियान 15 फेब्रुवारी ते 27 मार्च पर्यंत देशभर राबविण्यात येणार आहे. देशातील 11 कोटींहून जास्त कुटूंबांपर्यंत पोहचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व सामान्य नागरिकांनादेखील यामध्ये सहभाग घेता यावा म्हणून दहा रुपये, शंभर रुपये आणि हजार रुपयांचे कुपन तसेच ऑनलाईन निधी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देणगीदारांना 80 G अंतर्गत सवलत मिळणार आहे. स्वयंस्फूर्तीने मिळणारा समर्पण निधी संकलित करुन न्यासाकडे दिला जाईल अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी दिली.

मंगळवारी (दि. 12 जानेवारी) पिंपरी येथे ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी समर्पण व जनजागरण अभियान’ची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परांडे बोलत होते. यावेळी प्रांत सह संपर्क प्रमुख मिलींद देशपांडे, विभाग संघचालक आप्पासाहेब गवारे, पुज्य शांतीब्रम्ह हभप मारोतीबुवा कु-हेकर महाराज, देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप मधूकर महाराज मोरे आदी उपस्थित होते.

मिलींद परांडे यांनी सांगितले की, माननिय राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री मंडळासह, सर्व राज्यातील मुख्यमंत्री, देशभरातील कलाकार, उद्योजकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अयोध्या येथे श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने होणार असलेल्या राम मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन दि. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार केंद्र शासनाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी श्री राम जन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्रीगणेशा केला. प्रस्तावित निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूटांची असेल. मंदिराची एकूण उंची 161 फूट तर लांबी 360 फूट आणि रूंदी 235 फूट असेल. त्यावर पाच शिखर असतील. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांनी केलेले असेल यामध्ये सिमेंट व लोखंडाचा वापर होणार नाही. मंदिर परकोटाच्या बाहेर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा उभारण्यात येतील. एकूण तीन ते साडे तीन वर्षांच्या अवधीत हे कार्य पूर्ण होईल. मंदिर निर्माणानंतर तेथे संपूर्ण भारत देश, नंतर जवळपासचे आशियाई देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेच्या केंद्राच्या रूपात जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे केंद्र बनेल असा प्रयत्न आहे.

या महान कार्यासाठी रामभक्तांचा सहभाग निश्चित करण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमा पर्यंत म्हणजे दि. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत “निधी समर्पण अभियाना'चा संपूर्ण देशभर होत आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गाव तसेच 11 कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे आर्थिक पारदर्शिता रहावी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने पावती पुस्तके व 1000/-, 100/- आणि 10/- रुपयांच्या कूपन्सची व्यवस्था तसेच ऑनलाईन निधी देण्याचीही सोय आहे. या अभियानाकरिता विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकारात सर्व रामभक्त व कार्यकर्ते प्रत्येक जाती, संप्रदाय, मत, पंथ, क्षेत्र, भाषा, प्रदेशातील भाविकांशी संपर्क व जनजागरण करतील. अरुणाचल, (नागभूमि), नागालँड अंदमान – निकोबार सोबतच कच्छ रण, पर्वतीय क्षेत्र आणि वनांचलातील सुदूर व्यक्तींशीसुद्धा संपर्क होईल. काश्मीर ते कन्याकुमारी तसेच सोमनाथ ते मेघालयापर्यंत सर्व प्रकारच्या श्रद्धांच्या सेतुबंधनांनी राममंदिर उभे राहील. हे केवळ मंदिराचे बांधकाम नाही, अजेय राष्ट्रमंदिराच्या उभारणीचे कार्य आहे. लाखो हुतात्म्यांनी या धर्मकार्यात बलिदान दिले आहे अशीही माहिती परांडे यांनी दिली.

विभाग सह अभियान प्रमुख चंदुजी पाठक म्हणाले की, महाराष्ट्रात हे अभियान दिनांक 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत होणार आहे. या अभियानच्या माध्यमातून 45 हजार गावातील व शहरी भागातील सर्व वस्तीतून 2.5 कोटी कुटुंबांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याकरिता 5000 संत व 2.5 लाख रामभक्त कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या अभियानाची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात 1500 गावातील व 250 शहरी वस्तीमधील 11 लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात 12000 रामभक्त कार्यकर्ते पूर्णवेळ अभियानचे लक्ष गाठण्यासाठी कार्यरत राहणार आहेत सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे, विभाग सह प्रांत धर्मजागरण प्रमुख हेमंतराव हरहरे, विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, विहिंप प्रांत प्रचार प्रमुख विवेक सोनक, विभाग मंत्री नितीन वाटकर जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, शहर अध्यक्ष शरद इनामदार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे प्रांत, विभाग व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image