भारताचे लष्कर प्रमुख येत्या 9ते 14 डिसेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दि. 9 ते 14  डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीसाठी जनरल नरवणे रवाना झाले आहेत.  या दौऱ्यात जनरल नरवणे, दोन्ही  देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. भारताचे  लष्कर प्रमुख पहिल्यांदाच संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाला भेट देत असल्यामुळे त्यांच्या  या दौऱ्याला ऐतिहासिक महत्व आहे.

जनरल नरवणे दि. 9 आणि 10 डिसेबर, 2020 रोजी संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहेत. भारत- यूएई यांच्यामध्ये संरक्षण संबंध अधिक वृद्धिगंत करण्यासाठी संबंधित लष्करी अधिका-यांबरोबर आयोजित बैठकीत ते चर्चा करणार आहेत.

या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात जनरल नरवणे दि. 13 आणि 14 डिसेंबर, 2020 रोजी सौदी अरेबियाला जाणार आहेत. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यामध्ये असलेले उत्कृष्ट संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक वरिष्ठ संरक्षण अधिकारी, संस्थांचे प्रमुख यांच्याबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये संरक्षण विषयक विविध मुद्यांवर आदान-प्रदान करण्यात येईल. भारतीय लष्कर प्रमुख या दौ-यात सौदी अरेबियाच्या रॉयल सौदी लँड फोर्सच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. जॉइंट फोर्स कमांड मुख्यालय आणि किंग अब्दुल अझिझ लष्करी अकादमीलाही भेट देणार आहेत. जनरल नरवणे राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाला भेट देऊन संस्थेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना मार्गदर्शन करणार आहेत.