आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नाला हमखास यश मिळतेच : आमदार महेश लांडगे


निगडी : "विद्यार्थीदशेतच आपल्या करियरविषयी ध्येय निश्चित करुन ते प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वासाने व जिद्दीने प्रयत्न केले तर यश हमखास मिळते. खडकवासला येथील एन.डी.ए. मध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी परिक्षा देत असतात. त्यातील साडेतीनशे मुलांची निवड होते. अशा अवघड व देशसेवेची संधी देणाऱ्या सैन्यदलात निवड झालेल्या, अथर्व ओझर्डेची प्रेरणा घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत" असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या स्पर्धा विभागातर्फे एन.डी.ए. साठी निवड झालेल्या अथर्व ओझर्डे यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भास्कर रिकामे, रमेश बनगोंडे, हनुमंत लांडगे राजेश ओझर्डे आदि मान्यवर उपस्थित होते.


स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या स्पर्धा परिक्षा विभागामार्फत दरवर्षी एन.डी.ए. व अन्य सैन्यदलात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्वपरीक्षा व मुलाखत तंत्राची अल्प शुल्कामध्ये तयारी करुन घेतली जाते. ब्रिगेडियर बलजितसिंग गिल आणि त्यांचे प्रशिक्षित शिक्षक यांचे मार्गदर्शन मुलांना मिळते. फक्त चार वर्षात आज अखेर चार मुले एन.डी.ए. च्या विविध कोर्ससाठी निवडले गेल्याचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी प्रास्ताविकात सांगितले. रमेश बनगोंडे यांनी आभार मानले.