प्रेमाचे नाते समृध्द करणारे ‘तुझी झाले रे मी…’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


पुणे : काेराेनाच्या काळात लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना अनेक महिने घरी बसून रहावे लागले. यादरम्यान चिंता, नैराश्य, चिडचिडेपणा अशा अनेक गाेष्टी मनात घर करुन राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मनावर हाेऊ लागला. अशाप्रसंगी मनाला प्रफुल्लीत करणारी व नात्याला अधिकाधिक समृध्द करणारी एक निरागस प्रेमकहाणी, आर.सी.फिल्म निर्मित ‘तुझी झाले रे मी…’ या गाण्याचे रुपाने प्रेक्षकांचे भेटीस आले आहे. या सुमधुर गाण्याचे सर्व हक्क अग्रगण्य, दर्जेदार झी मराठी म्युझिक कंपनीकडे देण्यात आले आहेत.
लवकरच संगीतप्रेमींना झी म्युझिक कंपनीच्या अधिकृत यु-टयुब चॅनेलवर हे गाणे पाहता आणि डाऊनलाेड करता येणार आहे. त्याचबराेबर झी समूहाच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘झी वाजवा’ या पहिल्या म्युझिक चॅनेलवर देखील हे गाणे पाहता येईल. या गाण्याचे पाेस्टरचे अनावरण नुकतेच खासदार व अभिनेते अमाेल काेल्हे यांचे शुभहस्ते करण्यात आले.


आर.सी फ्लिमने या गाण्याची निर्मिती केली असून फ्लाईंग काईटस एंटरटेन्मेंटने निर्मिती सहाय्य केले आहे. प्रसिध्द सेलिब्रिटी अँकर आणि अभिनेत्री नयन जयप्रकाश हिने या गाण्याचे माध्यमातून अभिनय क्षेत्रात पुर्नरागमन करत स्वत:चा वेगळा ठसा या क्षेत्रात उमटवला आहे. अभिनेत्री नयन जयप्रकाश हिला आपण अनेक सेलिब्रेटी शाे व प्रसिध्द कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून काम करताना यापूर्वी पाहिले आहे. झी मराठीवील अत्यंत गाजलेली मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या गाण्याचे शीर्षक गीत लिखाण करणारे गीतकार नचिकेत जाेग व अमाेल साेनावले यांनी या नवीन गाण्याचे लिखाण केले आहे. तसेच झी मराठी वरील अनेक मालिकांचे शीर्षकगीत गाणारी व अनेक दर्जेदार नामांकित चित्रपटांचे पार्श्वगायन करणारी सुप्रिसध्द गायिका आनंदी जाेशी हिच्या मंजुळ स्वराने गाणे अधिकाधिक फुलले आहे. आनंदी सोबत अलेन के.पी.नेही गाणे गायले आहे आणि गाण्याला संगीत दिले आहे.


काेराेनाचे काळात सर्वत्र बंदी असल्याने प्रियेसीच्या मनात प्रियकरास भेटण्याची असलेली ओढ आणि प्रियकर व प्रियेसी यांचे नातेसंबंध समृध्द करणारी व एकमेकांना प्रेमात पाडणारी कथा या दर्जेदार गाण्याचेद्वारे प्रेक्षकांचे भेटीस आली आहे. प्रेम हे अजरामर असून नात्याचा गाेडवा टिकून रहावा हा संदेश यामाध्यमातून देण्यात आला आहे.


या गाण्याचे पाेस्टरचे अनावरण करताना खासदार काेल्हे म्हणाले, बदलत्या काळात लाेकांचा चित्रपट क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकाेन बदलला असून तंत्रज्ञानामुळे हे माध्यम अधिक प्रगल्भ हाेत आहे. त्यामुळे दर्जेदार निर्मितीची मागणी वाढली असून खासकरुन ग्रामीण भागातून अनेक हाेतकरु कलाकार चित्रपट व मालिका क्षेत्रात पुढे येत असतात. मात्र, त्यांना चांगला निर्माता मिळणे ही खूप महत्वपूर्ण गाेष्ट असते. आर.सी.फ्लिमसच्या माध्यमातून अनेक चांगल्या कामाची निर्मिती वेळाेवेळी वेबसिरीज, मालिका याद्वारे हाेत आहे. लाॅकडाऊन नंतर लगेचच या गाण्याची निर्मिती करण्यात आल्याने ज्यावेळी काेविडच्या महामारीनंतर अनेक कलाकार, बॅकस्टेज कारागीर, स्पाॅट बाॅय, तंत्रज्ञ यांची कामे बंद पडली अशावेळी अनेक कलाकारांना यामाध्यमातून राेजगार उपलब्ध झाला ही उल्लेखनीय बाब आहे.