कृषी कायद्यांना कृषी समुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद - प्रकाश जावडेकर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यांना कृषी समुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून केवळ पंजाब वगळता देशाच्या इतर भागात निदर्शनं झाली नसल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तर गोव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

शिरोमणी अकाली दल, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या राजकीय हेतूंमुळेच पंजाबात ही  निदर्शनं झाल्याचा आरोप त्यांनीं केला. प्रत्येक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून द्यायचा मोदी सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना स्वाभिमान समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याची टीका जावडेकर यांनी यावेळी केली.