देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ८५ पूर्णांक ५२ शतांश टक्क्यावर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या तीन आठवड्यांपासून देशातल्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असून देशाच्या कोरोनारुग्णांची संख्या दहा लाखाच्या खाली ठेवण्यात यश आलं असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.  गेल्या चोवीस तासात देशभरात ७८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ९३ हजारापर्यंत खाली आली आहे. एकुण कोरोनाबाधित रुग्णांपैकी १२ पूर्णांक ९४ शतांश टक्के लोकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले असून रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ८५ पूर्णांक ५२ शतांश टक्के राहिला आहे.

आतापर्यंत ५९ लाखांच्या आसपास कोरोनाबाधित बरे झाल्याने जागतिक पातळीवर रुग्ण बरे होण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये आणि बरे होणाऱ्या रुग्णांमधले अंतरही मोठे होत असल्याचं आरोग्य विभागानं म्हटले आहे. देशात सक्रिय रुग्णांच्या सातपट रुग्ण बरे झालेले आहेत. असंही आरोग्य विभागाने म्हटले असून देशाचा मृत्युदर १ पूर्णांक ५४ शतांश टक्के आहे.

गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ७० हजार ४७९ नवे रुग्ण आढळले असून ९६४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशात आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा आकडा ६९ लाख ६ हजार १५२ वर पोहोचला असून कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ६ हजार ४९० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

देशात गेल्या २४ तासात ११ लाख ६८ हजार ७०५ कोरोनाचाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरनं दिली आहे. देशात आतापर्यंत ८ कोटी ४६ लाख ३४ हजार ६८० चाचण्या झाल्याचंही त्यांनी सांगितले.