पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने आज जाहीर केली. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत या मदतीची घोषणा केली.


येत्या दिवाळीच्या आधी ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचवू, असे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.


पीके आणि घरांचे नुकसान तसेच, मृतांच्या वारसांना मदत, नुकसान झालेल्या सिंचन, जलसंपदा तसेच पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश या आर्थिक मदतीत केला आहे.


कृषीविषयक नुकसान आणि घरांच्या पडझडीपोटी, नुकसान भरपाई म्हणून साडेपाच हजार कोटी रुपये, रस्त्यांसाठी २ हजार ६३५ कोटी, ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी एक हजार कोटी, नगरविकासाकरता ३०० कोटी, उर्जा व्यवस्थेसाठी २३९ कोटी रुपये, तर जलसंपदा व्यवस्थेसाठी १०२ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.


जिरायती तसेच बागायत जमिनीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर १० हजार रुपये, तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.


राज्य सरकारपुढेही अनेक आर्थिक अडचणी आहेत, विविध संकटातल्या मदतीपोटी तसेच वस्तु आणि सेवाकराचे मिळून येणे असलेले ३८ हजार कोटी रुपये अजुन मिळालेले नाहीत, तीनदा विनंती करूनही, राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहण्यासाठी केंद्राचे पथकही अद्याप आलेले नाही, त्यांच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.


पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द असल्याने, ही मदतीची घोषणा करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


या आर्थिक मदतीसंदर्भात झालेल्या बैठकी, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, जलसंपदामंत्री, मृदा आणि जलसंधारणमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि परिवहनमंत्री सहभागी झाले होते.