अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रधानमंत्र्यांकडे मदत मागणार - शरद पवार


मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी प्रधानमंत्र्यांकडे मदत मागणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात सास्तूर इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना, हे आश्वासन दिलं.

अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं तसंच शेत जमिनीचंही प्रचंड नुकसान झालं असून त्यावर राज्य सरकार मदत करेल, परंतु त्याला मर्यादा असल्यानं या भागातले आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन प्रधानमंत्र्यांकडे मदतीची मागणी करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. त्यापूर्वी पवार यांनी आज सकाळी तुळजापूर तालुक्यात काक्रंबा इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली, काक्रंबा इथं बाधित शेतीची तसंच पावसामुळे वाहून गेलेल्या शेताची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले यावेळी उपस्थित होते. तूर, सोयाबीन, ऊस या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे तसंच शेतजमिनींचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असल्याचं मत, त्यांनी व्यक्त केलं.