राज्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसानमुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेली सोयाबीन, कापूस तसंच ऊस ही पिकं हातातून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर विविध मंत्री आणि विरोधी पक्षांचे नेते प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा आढावा घेत आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या इटकूर, हिरापुर, मादळमोही, मिरकाळ या गावातल्या शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीची पाहणी केली.अतिवृष्टी आणि पूरामूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, मदत करण्यासाठी गरज पडली तर राज्य सरकार कर्ज काढेल. मात्र शेतकऱ्यांना भरीव मदत करेल असा विश्वास पुनर्वसन आणि मदत कार्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त आहे. ते आज नांदेड इथ अतिवृष्टीमूळे झालेल्या पिक नुकसान आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी अतिवृष्टीमूळे पिक नुकसान, जीवीत हानी तसंच शेत जमीनी खरडणे, घरांची पडझड, रस्ते, पूल, वाहून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती या बैठकीत दिली. या बैठकीला आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर आदि उपस्थित होते.

 

दरम्यान, दुबार पेरणीच्या संकटातून सावरत नाही तोवर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतल्याचं चित्र आहे. सरकारनं पाहणी दौरे बंद करून तात्काळ मदत करावी अशी मागणी करत मुखेड, सलगरा या भागातल्या शेतकऱ्यांनी वडेट्टीवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारं निवेदनही दिलं. 


उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसंच दोन्ही समाभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार हे सोलापूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. अतिवृष्टीचा जोरदार फटका सेालापूर जिल्ह्याला बसला आहे.