अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन


मुंबई (वृत्तसंस्था) : पुरामुळे नुकसान झालेल्यांकरता जे काही शक्य आहे, आणि आवश्यक आहे, ते सर्व केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ते आज सोलापूर इथं पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर वार्ताहर परिषदेला संबोधित करताना बोलत होते. परतीचा पाऊस अजून पूर्णपणे गेला नसून हे संकट अद्याप टळलं नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आपण केवळ घोषणा करणार नसून, पुरामुळे  मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य्य करण्याचं काम सुरु झालं असून  एकूण नुकसानीबाबत पूर्ण माहिती हाती येताच प्रत्यक्ष मदत केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असून आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं ते म्हणाले. 


महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना तालुक्यातल्या आंतरवाला, गोलापांगरी, कुंबेफळ या गावांमध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

 

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी होत असून त्यामुळे शेतपीकांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी इगतपुरी तालुक्यात खंबाळे इथं नुकसानग्रस्त शेतपीकांची पाहणी केली. 


अतिवृष्टी आणि अवेळी आलेल्या पावसामुळे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांचं मोठया प्रमाणात नुकसान झालं असून, घोषित केलेल्या मदतीचा लोकांना लाभ देताना एकही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले. ते आज भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  


लातूर जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे  48 तासांत पूर्ण करावेत असे निर्देष जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती   पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.